ORD India > Media > RD News > तीरा कामत : ‘आमचं बाळ तर गेलं पण बेबी तीरासारखी अनेक बाळं आहेत ज्यांना वेळेत मदत मिळत नाहीये’
तीरा कामत : ‘आमचं बाळ तर गेलं पण बेबी तीरासारखी अनेक बाळं आहेत ज्यांना वेळेत मदत मिळत नाहीये’
काल अंकुर यांच्याशी बोलल्यानंतर आज सकाळी त्यांचा पुन्हा फोन आला, हे सांगायला की आरव वाचू शकला नाही. 12 फेब्रुवारीला सकाळी 7 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. “आमचं बाळ तर गेलं. असा त्रास असणारी खूप बाळं आहेत ज्यांना वेळेत मदत मिळत नाहीये,” अंकुर कुमार यांनी गहिवरल्या आवाजात सांगितलं. त्यांना बोलताही येत नव्हतं.
अंकुर कदम यांच्याशी काल काय बोलणं झालं होतं?
दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमधून अंकुर कुमार माझ्याशी बोलत होते, “हे काय, माझ्या समोर आमचं बाळ आहे, आयसीयूमध्ये… व्हेंटिलेटरवर.”
त्यांच्या भाच्याला, आरवला, तीरा कामत सारखाच SMA टाईप-1 म्हणजेच स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी हा मज्जातंतूशी निगडित दुर्मिळ आजार झाला आहे.
यात मज्जातंतू हळूहळू मरू लागतात आणि मेंदूकडून स्नायूंना जाणारे सिग्नल मंदावत गेल्याने स्नायूंवरही नियंत्रण राहत नाही. तज्ज्ञांच्या मते, हा आजार जेनेटीक डिसीज म्हणजे, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे.
पण इतक्यावरच त्यांची संकटं थांबली नाहीयेत. अंकुर कुमार यांच्या बहिणीला म्हणजेच आरवच्या आईला ब्लड कॅन्सर झालाय आणि आपल्या दोन जीवलगांच्या आयुष्यासाठी हे कुटुंब लढतंय.
आरवची आई पूजाही वेगळ्या दवाखान्यात अॅडमिट आहे. आरवचे वडील पत्नी आणि मुलाच्या आजारपणामुळे इतके खचून गेलेत की बोलण्याच्या परिस्थितीत नाहीयेत. सगळी धावपळ, मदत मागणं, पैसै जमा करण्याचे प्रयत्न आरवचे मामा अंकुर कुमार करत आहेत.
“आमचं बाळ आठ महिन्याचं आहे. गेल्या आठ महिन्यात माय-लेकाची फार फार तर दोन-तीनदा भेट झाली असेल. माझ्या बहिणीला कधी आयुष्यात सर्दीची गोळीही घ्यावी लागली नाही पण ती आता ल्युकेमियाने ग्रस्त आहे. त्या संकटाशी कसं लढायचं या विवंचनेत असतानाच कळलं की आरवला SMA टाईप-1 आजार आहे. आता या गोष्टीशी सामना कसा करायचा हेच कळत नाहीये.”
या आजारावर भारतात उपचार उपलब्ध नाहीयेत. यासाठी लागणारी औषधं अमेरिकेहून मागवावी लागतात आणि त्यावर भारतीय सरकारचा करही बराच असतो.
हाच आजार असणाऱ्या लहानग्या तीराच्या मदतीसाठी सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आलं. त्यासाठी पैसैही जमा झाले. पण मोठा प्रश्न उभा राहिला तो आयात शुल्क आणि जीएसटीचा. ही रक्कम सहा कोटीच्या घरात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंजेक्शनवरील आयात शुल्क आणि जीएसटी माफ करावं, असं आवाहन तीराच्या आई-वडिलांनी केलं होतं. आता तीराच्या औषधांवरचा टॅक्स माफ करण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.
या प्रकरणानंतर चर्चा सुरू झालीये ती म्हणजे तीरासारखी अनेक मुलं भारतात दुर्धर आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्या औषधोपचारांचं काय? त्यांना मदत कशी मिळणार?
“आरव लहान असल्यापासून त्याला काहीतरी त्रास आहे हे आमच्या लक्षात येत होतं. तो मोठा झाला तरी मान धरत नव्हता. त्याला पाय उचलता येत नव्हते. त्याच्या घशातून घर्रघर्र आवाज यायचे. आधी प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथला खर्च परवडेनासा झाला. बहिणीच्या उपचारांचा खर्च होताच.
काही गोळ्या औषधं देऊन त्याचा श्वास चालू होता असं म्हणा. पण महिनाभरापूर्वी आरव काहीच प्रतिसाद देईनासा झाला. त्याला पाजलेलं दुध त्याच्या तोंडातून बाहेर घरंगळलं. आम्ही तसंच त्याला घेऊन जवळच्या दवाखान्यात गेलो तर त्यांनी सांगितलं की आमचं बाळ गेलंय. पण तरीही त्याला सीपीआर देऊन पाहिला तर त्याच्यात धुगधुगी शिल्लक होती. आता त्याला एम्समध्ये हलवलं आहे. तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवरच आहे.”
बेबी आरवलाही त्याच 16 कोटी रूपयांच्या इंजेक्शनची गरज आहे जे बेबी तीरासाठी हवं आहे. बेबी तीराच्या इंजेक्शनसाठी अनेक दानशूरांचे हात पुढे आले. सरकारनेही टॅक्स माफ केला. आरवचे मामा अंकुर कुमारही या इंजेक्शनसाठी पैसे जमा करत आहेत. त्यांनीही लोकांना आवाहन केलंय की पुढे यावं, सढळ हाताने मदत करावी. सरकारकडूनही त्यांना मदतीची अपेक्षा आहे.